भारतीय रेल्वेचा इतिहास सर्वांना ठावूक आहे, भारतात सर्वप्रथम १८५३ साली ठाणे ते मुंबई या दरम्यान पहिली रेल्वे धावली. परंतु मराठवाड्यातील रेल्वेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?
छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या राजधानीचे हे शहर. आजघडीला या शहरात ये-जा करण्यासाठी रस्ते, विमान, रेल्वे असे वाहतुकीचे तिहेरी पर्याय उपलब्ध आहेत. या शहरातील आणि मराठवाड्यातील रेल्वेचा इतिहास खूप जुना आहे. चालू वर्षात म्हणजे २०२५ मध्ये येथील रेल्वेला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण मराठवाडा प्रदेश हा हैदराबादच्या निजाम राजवटीत होता. त्या काळी मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विणण्यासाठी निजामाने गोदावरी व्हॅली रेल्वे कंपनीची स्थापना केली. सन १८७६ मध्ये सहावा निजाम मीर महबूब अली खान याच्या कारकिर्दीत मराठवाड्यातील रेल्वेचे काम सुरू झाले. हैद्राबाद संस्थानमध्ये १८८५ साली सिकंदराबाद आणि वाडी दरम्यान पहिली ब्रॉडगेजलाईन टाकण्यात आली. तर हैदराबाद-मनमाड रेल्वे लाईनचे काम सन १९०० मध्ये पूर्ण झाले. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वेस्टेशन सुरू करण्यात आले. हैदराबादचा ७ वा निजाम मीर उस्मान अली खान याने हे रेल्वेस्टेशन बांधले.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षात सन १९५० मध्ये निजाम रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि ती भारतीय रेल्वेमध्ये विलीन करण्यात आली. सध्या मराठवाड्यातील रेल्वेचा कारभार दक्षिण मध्य रेल्वेत येतो. या रेल्वेचे महासंचालक कार्यालय सिकंदराबाद येथे तर मराठवाड्याचे विभागीय व्यवस्थापक कार्यालय नांदेड येथे आहे.
स्वातंत्र्यपूर्ण काळात भारतात इंग्रजांनी रेल्वे आणली. १९५३ साली ठाणे मुंबई दरम्यान पहिली रेल्वे धावली, त्यानंतर काही काळातच निजामानेही आपल्या हैदराबाद संस्थानात रेल्वेचे जाळे विणण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने पाऊले टाकली. निजाम हा महत्वकांक्षी होता. त्याच्या राज्यात स्वतंत्र रिझर्व्ह बँक, स्वतंत्र चलन होते, पुढे त्यात रेल्वेचीही भर पडली.
