जागतिक महिला दिन (8 मार्च) विशेष
# राणी व्हिक्टोरिया यांच्या फोटोचे जगातील पहिले व शेवटचे सोन्याचे नाणे 1841 साली
# अकोल्यातील ‘अक्ष करन्सीज’चे संचालक अक्षय खाडे यांच्याकडे आहे अनोखे संकलन.
अकोला : (‘मराठी मुलुख वृत्तसेवा’)
8 मार्च, जागतिक महिला दिवस…. जगभरातील मातृशक्तीला सलाम करण्याचा दिवस… आपल्या मातृशक्तीला पुजणारा उत्सव. ‘जागतिक महिला दिन’ म्हणजे मातृशक्तीचा सृजनोत्सव… तिच्या मातृत्वासोबतच तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा सोहळा… आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात अनेक महिलांनी भरीव योगदान देत यशाचे अनेक नवे अध्याय लिहिले आहेत.
याच करोडो महिलांच्या प्रयत्नांतून प्रगतीची भरारी घेऊ पाहणाऱ्या आपल्या देशाला नवं बळ, उर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. भारतीय समाजव्यवस्था ही पितृसत्ताक असल्यानं महिलांना त्यांचं हक्क मिळवायला आणि त्यांना नवी ओळख मिळवायला हजारो वर्ष लोटलीत. मात्र, अलिकडच्या शतकात भारतीय महिलांनी आपल्या कर्तृत्वानं देशाला मोठ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्यानं केलं आहे. आज भारतीय स्त्री ही जगातील प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारी स्त्री म्हणून ओळखली जाते. हा क्रांतीकारी बदल घडविण्याचं काम इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिलांनी केलं आहे. अगदी पुराणातल्या सिता, राधा, द्रौपदी, रूख्मिणीपासून इतिहासातील राजमाता जिजाऊ, राणी ताराबाई, झाशीची राणी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील अशा असंख्य महिलांपर्यंत हा प्रवास येऊन ठेवतो. मात्र, महिलांच्या उत्कर्षाच्या क्रांतीचा हा प्रवास सोपा होता का?, तर याचं उत्तर ‘बिल्कुल नाही’ असंच आहे. ‘जागतिक महिला दिना’च्या अंमलबजावणीचा इतिहास आणि कथाही मोठी रंजक अशीच आहे.
जागतिक महिला दिनाचा ‘इतिहास’ :
इतिहासात डोकावलं तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. नंतर 1910 मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला. यानंतर दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
नाणे, नोटा आणि पोस्टाच्या तिकिटांवरील महिला :
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1985 ते 2024 पर्यंत एकूण 10 थोर महिलांची छायाचित्रे भारतीय नाण्यांवर छापण्यात आली आहेत. राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील पहिले आणि शेवटचे सोन्याचे नाणे 1841 सालात काढण्यात आले होते. या नाण्याचे वजन 10..66 ग्रॅम एवढे होते. यानंतर जगातील कोणत्याही देशाने सोन्याचे नाणे काढले नाही. जागतिक, ऐतिहासिक मुद्रा, करन्सी संग्राहक आणि अकोल्यातील ‘अक्ष करन्सीज’चे संचालक अक्षय प्रदीप खाडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त ‘मराठी मुलुख’शी बोलतांना ही माहिती दिली.
याबाबत ‘मराठी मुलुख’ला अधिक माहिती देतांना अक्षय खाडे म्हणाले की, 1975 हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून घोषित केले. त्यानंतर पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला. चलनांवरील महिलांच्या छायाचित्राबाबत माहिती देताना अक्षय यांनी सांगितले की, 1975 साली भारत सरकारने दहा पैशांच्या चलनी नाण्यावर महिलेचे काल्पनिक चित्र काढून ते प्रसारित केले. त्यावर समानता, विकास, शांती हे स्लोगन छापण्यात आले होते. त्यानंतर 1980 साली 10 व 25 पैशांच्या नाण्यांवर महिलेचे काल्पनिक चित्र काढून त्यावर ‘ग्रामीण महिलाओ की प्रगती’ असे स्लोगन छापले होते.
नाण्यांवर झळकलेल्या भारतीय महिला :
माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची 1984 साली हत्या झाल्यानंतर 1985 साली 50 पैसे व पाच रुपयांचे नाणे काढून त्यावर इंदिरा गांधी यांचे छायाचित्र छापले होते. त्यानंतर एकदम 24 वर्षानंतर 2009 साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर सेंट अल्फोंसा यांचे छायाचित्र छापण्यात आले. कॅथोलिक चर्च द्वारा संत उपाधी दिलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. यानंतर 2010 साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर मदर तेरेसा यांचे छायाचित्र, 2014 साली 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका व अभिनेत्री बेगम अख्तर यांचे छायाचित्र,2015 साली स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात लढलेल्या राणी गायीदेनल्यू यांचे छायाचित्र 5 रुपये व 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर छापण्यात आले होते. 2016 साली 5 रुपये व शंभर रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे छायाचित्र, 2020 साली 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर श्रीमती विजया राजे सिंधिया यांचे छायाचित्र, 2023 साली 525 रुपयांच्या विशेष नाण्यावर संत मीराबाई यांचे छायाचित्र, 2023 सालीच 500 रुपयांच्या विशेष नाण्यावर राणी दुर्गावती यांचे छायाचित्र व मागील वर्षी 2024 साली 100 रुपयांच्या विशेष नाण्यावर सहज योगाच्या पुरस्कर्त्या निर्मलादेवी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.
जागतिक चलनावर झळकलेल्या आंतरराष्ट्रीय महिला :
संपूर्ण जगात 200 पेक्षाही जास्त देश आहेत. त्यातील इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड यांच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ तसेच कॅनडातील नोटांवर व्हिओला डिस्मंड यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. इतरही काही 10 ते 15 टक्के देशांच्या नोटा व नाण्यांवर त्या त्या देशातील थोर महिलांची छायाचित्रे छापण्यात आलेली आहेत. अशी ही माहिती अक्षय खाडे यांनी ‘मराठी मुलुख’ला दिली आहे.
संकटं आल्यावर त्याच्याशी दोन हात करीत अनेक महिलांनी आपले घर, संसार, शेती आणि समाज मोठा केला आहे. अनेक महिलांनी ही आव्हानं ‘रणरागिणी’, ‘नवदुर्गा’ बनत मोठ्या ताकदीने पेलली आहेत. भारतीय महिला या जगातील ‘नारीशक्ती’चे प्रतिक आहेत. कुटुंबासोबत देशाला सशक्त करीत मातृशक्तीचा आवाज बुलंद करणाऱ्या या स्त्री शक्तीला ‘मराठी मुलुख परिवारा’चा सलाम आणि मानाचा मुजरा…
